निसानने सीएनजी गाडी आणल्यानं टाटाच्या पंच सारख्या गाड्यांचे मार्केट कमी होईल का? निसानच्या नव्या गाडीचे फीचर्स काय आहेत?

WhatsApp Image 2025 05 30 at 08.36.04 e207a099

आजच्या घडीला आपण जेव्हा कार घेण्याचा विचार करतो तेव्हा सगळ्यात पहिले ती कार सीएनजी आहे का ते पाहतो. कारण पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिक कारपेक्षा सीएनजी कार सर्वसामान्याना फायदेशीर ठरते. आपण टाटा, मारुती सुजुकी, टोयोटा, रेनोलट, हुंदई हे काही प्रमुख गाड्यांचे ब्रॅंड पाहीले आहेत जे सीएनजीमध्ये त्यांच्या कार उपलब्ध करून देतात. सध्या सीएनजीमध्ये एसयूव्ही प्रकारात टाटाची पंच, नेक्सोन, मारुतीची ग्रँड विटारा, ब्रेझा आणि टोयोटाची अर्बन क्रुजर टाईसोर या गाड्या लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. या सगळ्या गाड्यांची किंमत साधारणतः ७ लाखांपासून सुरू होऊन ती त्यातील फीचर्सनुसार वाढत जाते. पण आता या सगळ्या टॉप ब्रॅंडला आणि गाड्यांना टक्कर देण्यासाठी निसान ही जपानी कंपनी एसयूव्हीमध्ये सीएनजी गाडी उपलब्ध करून देतेय आणि तीही फक्त ६ लाख १४ हजार रुपयांत…. १ जूनपासून उपलब्ध होणारी ही निसानची गाडी आणि तिला बसवले जाणारे किट सुरुवातीला ७ राज्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. ती ७ राज्य कोणती? निसानने सीएनजी गाडी आणल्यानं टाटाच्या पंच सारख्या गाड्यांचे मार्केट कमी होईल का? या निसानच्या नव्या गाडीचे फीचर्स काय आहेत?

काही दिवसांपासून जपानी कंपनी असलेली निसान भारतातील उत्पादन कमी करून भारत सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. परंतु त्याच निसानने एक महत्वाची घोषणा केली असून निसान मोटर इंडियाचे संचालक सौरभ वत्स यांनी २८ मे रोजी प्रसार माध्यमांना बोलताना सांगितले की, ‘Nissan Is Not Leaving India’आणि निसान भारतात १ जून पासून आपली मॅग्नाइट प्रकारात सीएनजी गाडी उपलब्ध करून देतेय जी लोकांना परवडणारी असेल. त्यामुळ सीएनजीमध्ये एसयूव्ही कार खरेदी करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल. निसानच्या मैग्नाइटचे हे बेस मॉडेल ६ लाख १४ हजार रुपयांना उपलब्ध करून देण्यात येणार असले तरी त्याला ७५ हजार रुपये वेगळे खर्च करून गवर्नमेंट सर्टिफाइड सीएनजी किट बसवून घ्यावी लागेल. जी मोटोजेन कंपनीने बनवलीय. त्यामुळं ७ लाख रुपयांच्या आत ही एसयूव्ही प्रकारातील गाडी ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. सीएनजी रेट्रोफिटमेंट किटवर कंपनी ३ वर्षांची किंवा १ लाख किलोमीटरची वॉरंटी देखील देतेय. मोटोजेन कंपनीने हे किट भारतीय नियमांनुसार बनवले असून हे किट फक्त सरकारने ठरवलेल्या केंद्रांवरच बसवले जाईल. हे सीएनजी किट एकाच वेळी देशभर उपलब्ध होणार नाहीत तर ते हळूहळू वेगवेगळ्या टप्प्यात उपलब्ध करून देण्यात येतील. पहिल्या टप्प्यात ही सुविधा दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि कर्नाटक या ७ राज्यांमध्ये उपलब्ध असेल. या राज्यांमधील निसान ग्राहक त्यांच्या जुन्या निसान मॅग्नाइट गाडीत सीएनजी किट बसवू शकतात किंवा नवीन गाडी खरेदी करून त्यातही बसवू शकतात. पहिल्या टप्प्यातील प्रतीसादानंतर, दुसऱ्या टप्प्यात ते किट देशभर उपलब्ध करून दिले जाईल. यामुळे आता निसान मैग्नाइटचे बेस मॉडेल सीएनजी किटसह ६ लाख ८९ हजार तर टॉप मॉडेल १० लाख दोन हजार रुपयांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. एकूण सहा व्हेरिएंटमध्ये ही सीएनजी किट बसवता येईल. दरम्यान, निसानने सीएनजी व्हेरिएंटचा मायलेज जाहीर केलेला नाही, परंतु तो “अत्यंत इंधन कार्यक्षम” असेल, आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा जास्त असेल याची खात्री दिली जातेय.

निसान ईव्ही बनवण्याऐवजी सीएनजी का स्वीकारतेय याविषयी कंपनीने सांगितले की, ग्राहकांची पसंती अजूनही सीएनजी मॉडेल्सला दिसतेय. तर ईव्ही किंवा हायब्रिड मॉडेल्ससाठी ती पसंती सीएनजीच्या तुलनेत खूप कमी असल्याचे जाणवते. तसेच देशातील सीएनजी स्टेशनची सध्याची संख्या वाढविण्यासाठी सरकार देखील प्रयत्न करत असून सरकारचे सीएनजी स्वीकारण्यावर लक्ष केंद्रित असल्याचे दिसतेय. याविषयी निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स म्हणतात की, नवीन निसान मॅग्नाइट हे आपल्या सर्वांसाठी एक अतिशय खास मॉडेल असून आजपर्यंत २ लाख यूनिटची विक्री झालीय. ज्यातील १.५ लाख युनिट्स देशांतर्गत विकले गेले आहेत आणि ५०,००० यूनिट निर्यात केलेत. त्यामुळं भारतातील आमच्या यशात मॅग्नाइटची मोठी भूमिका असून ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, निसान डीलर्स आता सरकार-प्रमाणित सीएनजी किटचा पर्याय देऊ देते आहे.

खरतर निसानने ही सुविधा देऊन साधारण बजेट असणाऱ्यांसाठी एक चांगला पर्याय दिलाय. यामुळं आता एसयूव्ही प्रकारातील गाड्यांमध्ये निसानचे मूल्य नक्कीच वाढणार असल्याचे दिसतय. त्यामुळं मॅग्नाइटच्या प्रतिस्पर्धी असलेल्या टाटाच्या पंच सारख्या एसयूव्ही गाड्यांचे मार्केट कमी होऊ शकते असे कार क्षेत्रातील तज्ञांकडून मत व्यक्त केले जातंय. सध्याचा ट्रेंड बघता सीएनजी कार महत्त्वाच्या आहेत कारण त्या पारंपारिक पेट्रोल आणि डिझेल वाहनांपेक्षा अनेक फायदे देतात, त्या अधिक पर्यावरणपूरक आणि परवडनाऱ्या आहेत. सीएनजी हे स्वच्छ इंधन आहे, जे बाकीच्याच्या तुलनेत उत्सर्जन कमी करते. आणि सरकार देखील सीएनजी स्टेशनची सध्याची संख्या वाढवतेय. जी निसान कंपनी भारत सोडून जाणार असल्याच्या अफवा पसरल्या गेल्या त्याच कंपनीने भारतातील ग्राहकांसाठी एसयूव्ही प्रकारात सीएनजी गाडी तीही स्वस्तात उपलब्ध करून दिलीय त्यामुळं निसान ग्राहकांचा विश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे यावरून दिसतेय. एकंदरीत तुम्हाला या निसानच्या नव्या गाडीबद्दल आणि त्यात बसविण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या किट बद्दल काय वाटतं? तुम्ही सध्या कोणती गाडी वापरता आणि तुम्ही जर गाडी घेण्याचा विचार करत असताल तर कोणती घ्याल? कमेन्ट करून जरूर सांगा आणि माहिती आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *