पंजाबचा पराभव करुन यंदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गेल्या १८ वर्षात पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा मान पटकावला. मात्र यानंतर एक चर्चा सुरु झाली ती म्हणजे आरसीबी संघाची विक्री केली जाणार आहे. मात्र यानंतर कंपनीची मालकी असलेल्या डियागो इंडियाने स्पष्टीकरण देऊन कंपनीचा असा कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. बीएसई म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजने कंपनीकडे याबाबत खुलासा मागितला होता आणि त्यानंतर कंपनीकडून बीएसईला निवेदन सादर करण्यात आलं. आरसीबीने ट्रॉफी जिंकल्यानंतर बंगळुरुमध्ये विजयी मिरवणूक काढण्यात आली होती आणि त्यानंतर एक दुर्दैवी घटना घडली. या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत ११ चाहत्यांना आपला जीव गमवावा लागला होता. बंगळुरुची ही चर्चा सुरु असतानाच सोशल मीडियावर अफवा पसरली की संघच विक्रीला काढण्यात आला असून डियागो इंडियाने २ हजार कोटी रुपये एवढं मूल्य निश्चित केलं आहे. यानंतर गुंतवणूकदारांमध्ये एकच भंबेरी उडाली, ज्यावर कंपनीला स्पष्टीकरण द्यावं लागलं.
बंगळुरुचा संघ विकण्याची तयारी? अखेर मालकाने स्वतःच स्पष्टीकरण दिलं
