दिल्ली, प्रकाश पाटील : महाराष्ट्रासाठी अभिमानाची बातमी! देशाची राजधानी दिल्लीतील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) अखेर ‘छत्रपती शिवाजी महाराज युद्धनीती आणि मराठा इतिहास अध्यासन केंद्र’ आणि ‘कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्र’ सुरू होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने ही ऐतिहासिक घडामोड घडत असून, १७ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रस्तावाला आता मूर्त रूप मिळाले आहे.
येणाऱ्या २४ जुलै २०२५ रोजी या दोन्ही अध्यासन केंद्रांचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यामुळे मराठी भाषा, साहित्य आणि इतिहास दिल्लीसारख्या केंद्रस्थानी विद्यापीठात मान्यता मिळणार असून, महाराष्ट्र संस्कृतीचा गौरव अधिक वृद्धिंगत होईल.विशेष म्हणजे, ‘छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र’ अंतर्गत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून जेएनयूच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज अंतर्गत युद्धनीती, संरक्षण व्यवस्थापन आणि इतिहास या विषयांवर अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. मराठा मिलिटरी हिस्ट्री, नौदल रणनीती, गुरिल्ला युद्धनीती, तसेच हिंदवी स्वराज्याची संकल्पना यांचा सखोल अभ्यास या अभ्यासक्रमांमध्ये केला जाईल. यात सुरक्षा रचना व व्यूहरचना या आधुनिक संदर्भांतूनही अभ्यास होणार आहे.
या उपक्रमात सेंटर फॉर ईस्ट एशियन स्टडीज चे प्रा. अरविंद वेल्लारी आणि सेंटर ऑफ युरोपियन स्टडीज चे डॉ. जगन्नाथन हे प्राध्यापक प्रमुख भूमिका बजावणार आहेत. संशोधन व अध्यापनासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे.दरम्यान, एकीकडे महाराष्ट्रात त्रिभाषा धोरणावरून राजकीय वातावरण तापलेले असताना, दुसरीकडे देशाच्या राजधानीत मराठी भाषेला आणि शिवकालीन इतिहासाला शैक्षणिक मान्यता मिळणे, ही राज्यासाठी आणि मराठी अस्मितेसाठी अत्यंत गौरवास्पद बाब ठरत आहे.या अध्यासन केंद्रांद्वारे डिप्लोमा आणि पोस्ट-ग्रॅज्युएट कोर्सेस लवकरच सुरू होणार असून, विद्यार्थी, संशोधक आणि इतिहासप्रेमींसाठी हे एक अनमोल व्यासपीठ ठरणार आहे.
ही घडामोड केवळ शैक्षणिक नव्हे, तर मराठी भाषेच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली परंपरेच्या राष्ट्रीय स्तरावरच्या पुनःस्थापनेचा प्रयत्न ठरणार आहे.