व्हायरल न्यूज : पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात मासे पकडण्यासाठी गेलेलं एक जहाज काही दिवसांपूर्वी उलटलं आणि 15 साथीदार देखत गेले. पण त्यातील एक जण 5 दिवस अन्नपाणी विना राहिला आणि त्याच नाव होतं रविंद्रनाथ. याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून समाजमाध्यमावर जी माहिती उपलब्ध होत आहे ती आपण पाहुयात.
बंगालच्या उपसागरात हल्दिया जवळ मासे पकडण्यासाठी रविंद्रनाथ आणि त्याचे 15 साथीदार गेले होते. पण अचानक समुद्राच रूप बदलले, जोरदार वादळ उठलं, लाटा निर्माण झाल्या आणि पाहता पाहता त्यांचं ट्रॉलर जहाज उलटलं.सर्वजण समुद्राच्या प्रचंड लाटांमध्ये वाहून गेले ज्यात रवींद्रनाथचाही समावेश होता. पण तो घाबरला नाही आणि तो मच्छीमार असल्याने त्याने पाण्याला त्याचा शत्रू नाही तर साथीदार बनवले आणि हार न मानता तो पोहत राहिला.
5 दिवस रवींद्रनाथ समुद्रात एकटा पोहत राहिला, ना खाणं, ना पिण्याचं पाणी, फक्त जगण्याचा हट्ट. जेव्हा पाऊस पडायचा, तेव्हा तो पावसाचं पाणी पिऊन स्वतःला जिवंत ठेवायचा. प्रत्येक क्षणी मृत्यू जवळ होता, पण त्याची हिम्मत त्यापेक्षा जास्त मजबूत होती. आणि 5 व्या दिवशी सुमारे 600 किलोमीटर दूर, बांगलादेशच्या कुतुबदिया बेटाजवळ, ‘एमव्ही जवाद’ नावाचं जहाज जात होतं आणि त्या जहाजाच्या कॅप्टनने दूरवर समुद्रात काही हलताना पाहिलं तेव्हा तो रविंद्रनाथ दिसला.
कॅप्टनने तात्काळ लाइफ जॅकेट फेकलं, पण ते रवींद्रनाथपर्यंत पोहोचलं नाही. तरीही कॅप्टन थांबले नाहीत. त्यांनी सीमा, धर्म, जातीच्या रेषा विसरून मदत करण्याचे ठरवले. काही अंतरावर रवींद्रनाथ पुन्हा दिसला आणि यावेळी कॅप्टनने जहाज वळवलं. लाइफ जॅकेट पुन्हा फेकलं, आणि यावेळी रवींद्रनाथने ते पकडलं आणि त्यानंतर क्रेनने त्याला वर खेचलं तेव्हा तो थकलेला, अर्धमेला, पण जिवंत होता.
या सगळ्या घटनेचा, त्या क्षणाचा व्हिडिओ जहाजावरील एका खलाशाने रेकॉर्ड केला तो प्रचंड व्हायरल होत असून पाहणाऱ्याच्या मनाला माणुसकीचे दर्शन देऊन जात आहे.